jump to navigation

समाजाचा विकास कसा होतो? August 16, 2007

Posted by neelkant in मनोगतावरचे लिखाण, माहिती, विदर्भ.
8 comments

येथे (इन्टरनेटवर) अनेक प्रदेशातील आणि जगातील अनेक प्रांत पाहिलेले लोक आहेत. जगभ्रमंतीने अथवा अनुभवाने आपली समाजाविषयी काही मते तयार होतात. त्यापैकी मला आज समाजाच्या विकासाची कारणे हवी आहेत.

समाज विकास म्हणजे काय? हा वाद नको म्हणून मी या चर्चेची पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राचा पुर्वेकडचा भाग म्हणजे विदर्भ ! हा भाग इतर महाराष्ट्राच्या , विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने मागे आहे. मागे म्हणजे येथे औद्योगीक विकास नाही,दरडॊई उत्पन्न कमी आहे,शिक्षणाच्या आणि पर्यायाने नोकरीच्या संधी कमी आहेत. शेती कायम तोट्यात आणि आता तर परिस्थीती अधिकच भयावह होत आहे. एक तर पाणी पडत नाही आणि पडले तर या वर्षीसारखे भरपूर की जी रोपटी रुजलीत ती कुजून गेली.

शेतकायांच्या आत्महत्या, मेळघाटाचे कुपोषण , गडचिरोलीचे नक्षलवादी आंदोलन आदी अनेक प्रश्न आऽ वासून उभे आहेत. सहकार रुजत नाही, सरकार बधत नाही, तरुणांना उमेद आहे पण लोक प्रतिनीधी अथवा जेष्ठ लोक त्याला विधायक वळण देताना दिसत नाहीत.

यात काही आशेच्या गोष्टी म्हणजे आता समाजातून स्वत:हून समोर येऊन कामे होताना दिसत आहेत. मेळघाट आणि गडचिरोलीला लोकसहभागातून कामे होताहेत. सामाजीक चळवळीतून उदयास आलेले बच्चू कडू सारखे नवीन राजकिय नेतृत्व लाभते आहे. पण हे अजूनही प्रायोगीक स्तरावत म्हणावे एवढे लहान आहे.

मी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात फिरतो तेव्हा एक संपन्नतेचं चित्र दिसतं. मात्र जेव्हा याप्रदेशाने ‘विकास करायचा असे ठरवून’ वाटचाल केली असेल. तेव्हाचा, सुरवातीचा काळ तर नक्कीच कठीण असेल ना ? कारण नैसर्गीक संपत्तीत विदर्भ महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत होता आणि आहे, मग तरी सुध्दा हा मानवी विकासाचा असमतोल का? कदाचीत कुठेतरी सामाजीक जडणघडण वेगळी असावी.सामाजीक जाणीव वेगळी असावी आणि ती ‘त्या’ पहिल्या पिढीने ‘जीने’ हा विकास करण्याचे स्वप्न पाहिले त्यांनी ही मुल्ये समाजात जाणीवपुर्वक रुजवीले असतील. तो प्रवास कसा झाला असेल?

यावरून अनेक प्रश्न निर्माण होताहेत. मी जेव्हा मुंबईत जातो तेव्हा वातावरणात सर्वत्र एक उर्जा असल्याचा भास होतो. मुंबईकरांची जगण्याची धडपड आणि त्यासाठी ५:१७ ची स्लो आणि ११:३ची फास्ट अश्या चर्चा. आदी सर्वांचा एक सार्वत्रीक प्रभाव असा दिसतो की प्रत्येकाला एक व्हिजन आहे – विकास ! स्वत:चा विकास!! मुंबईकर भारताचा अथवा समाजाचा विचार करीतच असेल असं नाही पण पर्यायाने समाजाचा आणि भारताचा विकास तर होतोच आहे ना? निदान असा स्वत:चा विकास करण्याची किमाण चेतना तरी कशी जागवता येईल?

पुण्यात असल्यावर या शहराच्या संस्कृतीचा आणि ती संस्कृती निर्माण आणि सांभाळ करण्याच्या जवाबदारीचं जे भान पुण्याला आहे , त्या बद्दल नक्कीच नवल वाटतं. संस्कृती सांभाळनं म्हणजे अगदीच काही अठराव्या शतकात जावं लागत नाही. एकविसाव्या शतकाशी जुळवून घेऊन नव्हे;  त्यात अग्रेसर राहून सुध्दा आपली संस्कृती जपता येते हे पुण्याकडून शिकावं. विदर्भाला आपली एक संस्कृती आहे आणि संस्कृती जतन करण्यासाठी काही तरी स्वत:हून करावं लागतं याचं भान काही साहित्यीकांना आणि त्यांच्या पुस्तकांनाच तेवढं असल्याचं जाणवतं.

काय करावं? जातींपातीच्या जेष्ठश्रेष्ठतेत विदर्भाच्या सहकाराचा बळी गेला. राजकारणी इथून तिथून सारखेच, पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी आंब्याचं झाड लावतात ते मोठं करतात आणि आंबे खातात , पण निदान त्या झाडाची पाने लोकांपर्यंत पोहचतात.विदर्भातील राजकारणी आंब्याचं रोप लावतात, त्याला पाने लागताच ओरबाडून खातात, मग ते रोपच करपतं. लोक शहारतात आणि पुन्हा कुठलंच रोप लावल्या जात नाही. कुणी लावण्यास गेलाच तर त्याला विरोध होतो. आमच्या कित्येक सहकारी सुत गीरण्या ज्यांचं बीजभांडवलच आमचे राजकारणी गडप करून बसलेत. त्या या विधानाची सत्यता पटवतील.  सगळीच निराशा ! सगळीच हताशा !!

पण… पण आता एक आशा आहे. आता जो विदर्भाचा तरुण आहे तो मात्र आता पुढं सरसावतोय. जो जिथं असेल तो तिथून काही तरी करू इच्छीतो. शिक्षणासाठी, नोकरीसाठी घर सोडून बाहेर गेलेले तरूण.आपल्या विदर्भासाठी काही करत आहेत. विदर्भातील तरूण प्रत्यक्ष काम करायला सरसावले आहेत. त्यांच्यात उमेद आहे,उत्साह आहे. आता मात्र हा प्रयोग फसायला नको… येत्या १० वर्षात विदर्भाचा कायापालट व्हायला हवा. त्यासाठी हवी असलेली जागृती होते आहे. याला दुर्दैव म्हणा अथवा काहीही… पण वेगळ्या विदर्भाची चळवळ सुध्दा ही जाणीव जागृत करण्याकरीता सहाय्यीभूत झाली आहे. अर्थात सामान्य विदर्भीय जनता हा राजकारण्याचा खुर्ची बचावाचा प्रकार आहे हे पुरतं जाणून आहे.

आता गरज आहे ती अनूभवी लोकांच्या सल्ल्याची. कुणाला काही सुचतंय का? जे काही असेल जसं काही असेल तसं. पण कामात येईल असं. आम्ही वाट पाहतो आहोत. तुमचा अनुभव आणि अनुभवातून आलेलं शहानपण आम्हाला पुन्हा पुन्हा त्याच चुका करण्यापासून थांबवेल. येथे काही महत्वाच्या सुचना आल्यास विदर्भातील वर्तमानपत्रांतून त्या प्रकाशीत करून सर्वत्र पोहचवण्याचा मानस आहे.

मराठी आणि संगणक क्रांती. August 16, 2007

Posted by neelkant in मनोगतावरचे लिखाण, माहिती.
4 comments

नमस्कार मराठी समाज संगणक क्रांतीमधे खुप पुढे आहे. मात्र मराठी खुप मागे. याची कारण मीमांसा प्रत्येकाने करायला हवी. आज या चर्चेचा उद्देश्य म्हणजे प्रत्येकाला करायला काहीतरी द्यावे हा आहे.

मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहीली जाते. युनिकोड नावाचे जे जगमान्य प्रमाण आहे, त्यामुळे मराठीच्या कळसंचाचा सार्वत्रीक गोंधळ दुर होण्यास मदत होईल असं वाटतं.

आता मात्र साफ्टवेअर आणि जमल्यास समग्र चालना प्रणाली मराठीत असावी अशी मागणी होते आहे. युनिकोड वापरून मराठी लिहीणाऱ्यांचे प्रमाण पाहता हे काम खुप कठीण आहे असं वाटत नाही. मात्र गरज आहे ती प्रेरणेची.  अनेक लोकांना नेमके काय करावे ते कळत नाही. या चर्चेद्वारे जाणकार नेमकं काय करावं ही माहिती देतील असं वाटतं.

मला माहित असलेले दोन प्रमुख मार्ग म्हणजे जे प्रोग्रामर आहेत त्यांनी मराठी केन्द्रस्थानी ठेवून निर्मीती करावी. जसे आपल्या ‘ओंकार जोशी’ यांनी ‘गमभन’ तयार केले. 

दुसरा म्हणजे आम्हा सामान्य लोकांचा , ज्यांना प्रोग्रामींग मधलं काही कळत नाही त्यांनी भाषांतराचं तितकंच महत्वाचं काम करावं. भाषांतर करण्यासाठी अनेक लोकांची गरज आहे. अनेक सॉफ्टवेअर असे आहेत की जे आपण सहज मराठीतून उपलब्ध करून देऊ शकतो. मी कुठेतरी असं वाचलं आहे की, पुरेश्या वाक्य संग्रहानंतर हे काम (भाषांतराचं) एका प्रोग्रामने सुध्दा करणे शक्य आहे. मात्र त्याला शेवटचा हात मानवी असणं गरजेचं असतं कारण भाषांतर हेच उपयोगकर्त्याशी थेट संपर्क साधते. त्यामुळे त्यात सहजता आणि संपुर्णता असणे आवश्यक आहे. याकरीता भरपुर मनुष्यबळ असने गरजेचे आहे.  आज मनोगतावर, जालनिशीवर आणि इतरत्र मराठीतून लिहीणाऱ्यांची मोठी संख्या पाहता हे अशक्य नाही. 

या दृष्टीने काही प्रयत्न सुरु झालेले आहेत . त्यांच्या विषयी खाली दुवे दिलेले आहेत. मग अडचन काय आहे?  तर अडचन ही आहे की ही कामे एका नावाखाली नाहीत , आधीच संख्येने कमी आणि त्यातही विलग त्यामुळे संवाद नाही. नविन सदस्यापुढे गोंधळ, कुणाला सामील व्हावे? खरं तर अनेक ग्रुप असने ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे नवीन कल्पनांना चालना मिळते. मात्र त्यांची संख्या वाढायला नको का? आणि हो या सर्व ग्रुप्सनी एकत्र येऊन काही भाषांतर प्रमाण ठरवायला हवेत. जसे फाईल या शब्दाला एक मराठी प्रतिशब्द नक्की करावा व तो प्रत्येक प्रकल्पात- प्रत्येक गटात कायम ठेवावा. या करीता आपल्याला मिलींद यांच्या शब्दसंग्रहाची मदत घेता येईल.

मी खाली काही ग्रुपचे आणि काही संकेतस्थळांचे दुवे देत आहे. तुमची माय मराठीसाठी काही करण्याची इच्छा असेल तर जरूर त्यांना सामील व्हा.

१) मराठीच्या भाषांतरनासोबतच त्याचे प्रमाणिकर्ण करने गरजेचे आहे. अन्यथा प्रत्येकाच्या आवडीने केलेले भाषांतर सामान्य उपयोगकर्त्याच्या अडचणीच केवळ वाढवेल. हे कसे करावे या करीता. एका अंकुर नावाच्या बंगाली ग्रुपचे संकेतस्थळ देत आहे. याचा उल्लेख जागतीक स्तरावर केला जातो. दुवा

२)आताश्या एक लिनक्स चे नवी आवृत्ती आलेली आहे. तीचं नाव उबंटू (उच्चार चुकल्यास सांगणे). या उबंटूचा मराठी भाषांतरणाचा प्रकल्प चालू आहे. तुम्ही त्या प्रकल्पाला सामील होऊ शकता. दुवा

या प्रकल्पातील मराठीची सद्यस्थीती तुम्ही येथे पाहू शकाल. दुवा२)एक देवनागरी नावाचा ग्रुप खुप आधीपासून या क्षेत्रात आहे. तेथे जरूर जा . दुवा

३)एक नवा चर्चा गट स्थापन झाला आहे. येथील प्रशासक खुप उत्साही आहेत. येथे तुम्ही सामील होऊ शकता . दुवा

4) मराठी मुक्तस्त्रोत ग्रुप याहूवर आहे. दुवा

मुक्त स्त्रोत चालना प्रणाली ही भारतीयांसाठी वरदान ठरेल असं म्हणतात. या क्षेत्रात भाषांतराची खुप गरज आहे. तेथे जरुर मदत करा. असे अनेक ग्रुप सध्या कार्यरत आहेत. आपणास काही माहीती असेल तर ती सुध्दा येथे द्यावी.

भारतातील प्रमुख संघटना August 16, 2007

Posted by neelkant in मनोगतावरचे लिखाण, माहिती.
add a comment

१) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – आज भारतात सर्वात जूनी आणि मोठी अशी संघटना आहे. जी आता राजकीय पक्ष म्हणून काम करते आणि गेल्या ६० वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील ५० वर्षे हाच पक्ष राज्यकर्ता होता. याची स्थापना १८८५ ला काही लोकांनी मिळून सरकाराला सनदी मार्गाने आपले अधिकार मागण्यासाठी केली. या संघटनेचे प्रवर्तक एक ब्रिटिश , सर ऍलन ह्युम होते. खरं तर भारतीयांच्या असंतोषाला एक सनदशीर मार्गाने वाटकरून देण्याचा हा प्रयत्न होता. त्यावेळचा व्हॉईसरॉय डफरीन याचे या प्रयत्नाला समर्थन होते. मात्र हा त्याचा सहभाग पुढे खूप काळ पर्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. पुढे या संघटनेचे विचार बदलले, संघटनेला आक्रमक रूप आले, संघटनेत समर्पित आणि आक्रमक सदस्यांची संख्या वाढली आणि सारा देश एकाच विचाराने एका संघटनेशी बांधल्या गेला. एकच विचार.

पुढे पुन्हा परिस्थिती बदली, तसा विचार बदलला , प्रमुखांनी सांगून सुद्धा संघटनेचं विलिनीकरण केलं नाही, त्याला राजकीय चाहूल तर आधीच लागलेली , मग त्या संघटनेचं राजकीय पक्षात रुपांतर केलं. या संघटनेचं स्वातंत्र्यानंतरचं स्वरूप आपल्या समोर आहेच. विशाल व्याप्ती असं या संघटनेचं जसं वैशिष्ट्य सांगता येतं ना ! तसंच फूट हे सुद्धा यां संघटनेचं एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. १९०७ पासून ते आजतागायत सतत काहीतरी पडझड या संघटनेत होतच आहे.

२)राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – भारतातील आजची प्रमुख स्वयंसेवी संघटना जी “संघशक्ती कलियुगे” असं मानते आणि तिचा १५ पेक्षा अधिक वेगवेगळ्या संघटनांच्या पसाऱ्याचा आवाका पाहता. भारतीय समाजजीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करण्याच्या त्यांच्या घोषणेत तथ्य वाटते.

१९२५ साली काही मुलांना घेऊन डॉ. हेडगेवारांनी नागपुराला या संघटनेची स्थापना केली. समग्र हिंदू संघटन हा विचारांचा मुख्य आधार. व्यक्ती- व्यक्ती संपर्क आणि रोज एक ठरावीक काळ एकत्र येणे हा मुख्य कार्यक्रम. एक संघटना म्हणून या संघटनेची संरचना आणि कार्यपद्धती अतिशय उत्तम आहे. शिस्त , ठराविक कार्यपद्धती आणि आपल्या विचारांवर अघाढ श्रद्धा ही वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. सुरवातीच्या काळातील कार्यकर्त्यांनी केलेले काम वाचलेकी लक्षात येईल की किती कठीण परिस्थितीतून ही संघटना बांधली गेलेली आहे.

या संघटनेचे प्रमुख खूप तज्ज्ञ असावेत. म्हणून त्यांनी समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी वेगळी ठेवण असलेली संघटना बांधलेली दिसून येते. या सर्वांतील सामायिक दुवा म्हणजे ही संघटना असे.

मात्र १९९६ पासून म्हणजेच यांच्या विचाराच्या संघटनेचं सरकार आल्या पासून मात्र या संघटनेत खुपसा बदल झालेला दिसून येतो. त्या आधी या संघटनेचा आणि सरकारातील त्या पक्षाचा काहीही संबंध नाही हे ठासून सांगितल्या जायचं. मात्र पक्ष सत्तेवर आल्यावर त्या पक्षाला प्रसिद्धी माध्यमातून आदेश देण्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. आणि आता पुन्हा हम आपके है कौण? सारखा प्रकार दिसून येतो.

संघटनेचा आधार जरी भक्कम असला तरी मुख्य काम काहींस दुर्लक्षिल्या जातंय असं वाटतं. असो. मात्र या संघटनेचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात गेल्या ७५ वर्षात कधीही फूट पडलेली नाही. कधीही एखादा गट बाहेर येऊन, समान नावाची(कंसात काहीतरी उल्लेख असलेली) दुसरी संघटना तयार केल्याचे झालेले नाही.

३)भारतीय कम्युनिस्ट पक्ष – १९२५ लाच निर्माण झालेली आणि आज पर्यंत प्रबळ अस्तित्व असलेली आणखी एक संघटना आहे. हिची स्थापना मानवेंद्रनाथ रॉय यांनी रशियात केली होती. मात्र याबाबत एकमत नाही. वर्ष मात्र नक्की. मानवेंद्रनाथ रॉय हे भारतीय इतिहासातील एक अनमोल रत्न.

वर्ग संकल्पनेवर आधारीत विचारधारा घेऊन ‘आहे-रे’ आणि ‘नाही-रे’ च्या गटातील; बहुसंख्य ‘नाही-रे’ या गटाचे प्रतिनिधित्व ही संघटना करते. जगात अनेक राष्ट्रांत हि विचारधारा पसरली. वाढली आणि बदलत्या काळासोबत बदलली(चीन) किंवा मोडकळीस निघाली(रशिया , आग्नेय आशिया) . मात्र भारतात बंगाल आणि केरळ या राज्यांत हिचे अस्तित्व प्रबळ आहे.

भूमिहीन मजूर , छोटे शेतकरी, कामगार आणि शोषीत घटक यांचे हितसंवर्धन करण्यासाठी स्थापन झालेल्या यां संघटनेचे कालांतराने काही वेगवेगळ्या संघटनांत रुपांतर झाले. मात्र मूळचा आक्रमक स्वभाव सर्वांत कायम आहे. अनेक संघटना याच विचाराशी नाते सांगतात. भारतात काही संवैधानीक मार्गाने काम करताहेत. तर काही हे संविधानच नाकारून व्यवस्था बदल करण्यासाठी सशस्त्र मार्गाने प्रयत्नशील आहेत. 

परस्पर विरोधी अशी काहीशी विचारसरणी असल्यावरही संघात आणि या संघटनेत एक सामायिक शक्तीस्थान आहे, ते म्हणजे समर्पित आणि तल्लख कार्यकर्ते. आपलं अवघं जीवन आपल्या विचाराच्या प्रचारा-प्रसारासाठी समर्पित करून समाजासाठी आयुष्यभर सतत काम करत राहणे हे या कार्यकर्त्यांचं जीवनकार्य. यांच्याच भरवशावर ह्या संघटना वाढताहेत. आणि लोकांचा विश्वास संपादन करताहेत. १९९६ साली संघाला आणि २००३ साली कम्युनिस्ट पक्षाला केंद्रात  सत्तासुख मिळताना दिसत आहे. हा योगायोग की काय?

येथे भारतातील इतरही काही संघटनांचा उल्लेख व्हायला हवा होता. मात्र आता थांबतो. त्या पैकी काहींचा नामोल्लेख जाता जाता करतो. रामकृष्ण मिशन , गुरुदेव सेवा मंडळ, समाजवादी (सगळे कंसातील सहीत) पक्ष, आसू सारख्या विध्यार्थी संघटना, बामसेफ , मराठा महासंघ, हिंदूमहासभा, हिंदू सेना आणि शिवसेना आदी.

प्रतापराव गुजर August 16, 2007

Posted by neelkant in कथा, मनोगतावरचे लिखाण, माहिती.
18 comments

कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.

एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर.

यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं.

पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.

बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता.  त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.

मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.

शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना  राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.  

महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.

अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे?  तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.

बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.

अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही !  प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.    

प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.

______________________________________

वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा वर दिली आहे.

प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी  शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी  गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.

महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले.

पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा.

अमरावती जिल्हा October 25, 2006

Posted by neelkant in माहिती, विदर्भ.
10 comments

क्षेत्रफळ १२२१० चौ.कि.मी.

इतिहास:-

१८५३ च्या कराराद्वारे हैदराबादच्या निजामाने अमरावती जिल्ह्यासहित सर्व बेरार (वऱ्हाड / विदर्भ) ईस्ट इंडिया कंपनीकडे सुपूर्द केला. कंपनीने वहाड प्रांताचे दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन केले – १)दक्षिण वऱ्हाड – त्याचे मुख्यालय हिंगोली येथे होते.

२)पूर्व वऱ्हाड – उत्तर वऱ्हाडाचे रुपांतर पूर्व वऱ्हाडात करण्यात आले.त्याचे मुख्यालय अकोला येथे होते.

१८६४ मध्ये अमरावती मधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला. १९०३ मध्ये निजामाने वऱ्हाड ब्रिटिश भारत सरकारकडे कायमस्वरूपी सुपूर्द केला.(ईस्ट इंडिया कंपनीला तो काही कालावधीसाठीच देण्यात आला होता.) १९०३ मध्ये वऱ्हाड मध्यप्रांताला जोडण्यात आला. आणि मध्यप्रांत व बेरार असा मोठा प्रांत निर्माण करण्यात आला. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन याने वऱ्हाड मुंबई प्रांतास जोडण्यास नकार दिला. मराठी भाषिकांमध्ये प्रांतिक फूट पाडणे हा त्याचा हेतू होता. १९५६ मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. १९६० मध्ये महाराष्ट्र व गुजरात वेगळा झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. अमरावती जिल्हा दख्खनच्या पठारावर पूर्णपणे स्थानबद्ध आहे.

प्रशासकीय विभाग

– जिल्ह्याचे विभाजन १४ तालुके आणि ६ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.

१)अमरावती – अमरावती, भातकुली, नांदगाव(खंडेश्वर).

२)दर्यापुर – दर्यापूर, अंजनगाव.

३)अचलपूर – अचलपूर, चांदूर बाजार.

४)मोर्शी- मोर्शी, वरुड.

५)धारणी – धारणी, चिखलदरा.

६)चांदूर(रेल्वे)- चांदूर(रेल्वे),धामनगाव, तोईसा.

प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असं सांगतात.

अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचं नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. १९४६ साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली. १९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे. १८९७ चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सी. शंकरन नायर हे होते.

अमरावती जिल्ह्याला अकोला,यवतमाळ, वर्धा , अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत.अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील अग्रगण्य संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते.

पर्यटनस्थळ

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे.अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदऱ्याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.

सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून ८ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरमपाण्याचे झरे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षण आहेत.

विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महानुभाव पंथीयांचे हे सर्वात प्रमुख तिर्थस्थळ आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.

अचलपुर तालुक्यातील बहीरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. येथे बहीरम (भैरव) या देवाची पुजा केली जाते. येथे दरवर्षी महिनाभर जत्रा चालते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांत प्रसिद्ध आहे.

अमरावती जिल्ह्यातील महत्वाचे पीक कापूस हे आहे. पूर्णा, तापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. वर्धा नदीवर सिंबोराजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. शहानुर नदीवर शहानुर प्रकल्प आहे. अमरावती शहरात वडाळी तलाव व छत्री तलावातून पाणी पुरवठा होतो.

अमरावती येथे रासायनिक खताचा कारखाना आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये रेगूर ही काळी मृदा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. १९४२ च्या चळवळीत या जिल्ह्याचे महत्वाचे योगदान आहे. ब्रिटिशांच्या दडपशाहीने जिल्हा हादरून गेला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर थाप मारून जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय आंदोलनास प्रेरित केले. ..

पर्यटन :

चिखलदरा या ठिकाणाचे उल्लेख महाभारतात आढळतात. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला ‘किचकदरा’ असे नाव पडले, त्यावरूनच पुढे ते चिखलदरा झाले. महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश म्हणून चिखलदरा ओळखला जातो. आताशा येथे मध व स्ट्रॉबेरी चे सुद्धा उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतल्या जात आहे. मेळघाट हा जंगलव्याप्त परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्या गेला आहे. १९७२ ला घोषित केल्यागेलेल्या देशातील १५ व्याघ्रप्रकल्पांतील हा एक. येथे १०० हून अधिक वाघ आहेत. वाघांव्यतिरिक्त हा प्रदेश चित्ते, अस्वल, सांबर, रानडुक्कर, जंगलीकुत्रे , मोर आदींसाठी प्रसिद्ध आहे.

चिखलदऱ्या जवळची काही आकर्षण केंद्रे :

१) मेळघाट व्याघ्रप्रकल्प , कोलखास आणि सीमाडोह हे निसर्गरम्य स्थळे.

२)गावीलगड किल्ला.

३)नर्नाळा किल्ला.

४)पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन

५)ट्रायबल म्युझीयम

अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण पॅराग्लाईडींगसाठी हळूहळू उदयास येत आहे. भारतात पॅराग्लाईडींग मोजक्याच ठिकाणी होतं. महाराष्ट्रातील हे तिसरे ठिकाण आहे.

शिक्षण:-

जिल्ह्यात तीन अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.

१) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.

२)V.Y.W.S. अभियांत्रिकी महाविद्यालय , अमरावती

३)सीपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.

वैद्यकीय महाविद्यालये –

१) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती.

२)विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती.

३)V.Y.W.S. दंतशल्यचिकित्सा महाविद्यालय, अमरावती.

४)श्री वल्लभ तखतमल होमीओपेथी महाविद्यालय, अमरावती.

५)पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ होमियोपेथीक मेडिकल सायन्सेस, अमरावती.

शारीरिक शिक्षण

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती.

ही शारीरिक शिक्षण क्षेत्रात जागतिक मान्यता असलेली संस्था म्हणजे अमरावतीचं भूषण आहे. जागतिक दर्जाच्या खेळ सुविधा येथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. येथे शारीरिक शिक्षणाचा पदवी अभ्यासक्रम चालवल्या जातो.

 शिक्षण:

प्राथमिक शाळा: १७७८ माध्यमिक शाळा: ३६४ महाविद्यालये : ३६ अध्यापक विद्यालये: ८ आदिवासी आश्रमशाळा: ३६ अभियांत्रिकी महाविद्यालये : ३ तंत्रनिकेतन : ६ औद्योगिक प्रशिक्षण संस्था: २ वैद्यकीय महाविद्यालये: ५

आरोग्य:

जिल्हा सामान्य रुग्णालय: १ जिल्हा स्त्री रुग्णालय : १ जिल्हा क्षय रुग्णालय : १ प्राथमिक आरोग्य केंद्र : ५६ ग्रामीण कुटुंब केंद्र : १४

पिके

पिका खालील क्षेत्र : ८०१ हजार हेक्टर

ओलीत क्षेत्र : ६२ हजार हेक्टर

जलसिंचन :

मोठे प्रकल्प – १ मध्यम प्रकल्प – २ लाभक्षेत्र : १६ हजार हेक्टर शेती पतसंस्था : ३८१

वारी भैरवगड August 28, 2006

Posted by neelkant in माहिती, विदर्भ.
add a comment

वारी भैरवगड तेल्हारा तालुका अकोला जिल्ह्याच्या उत्तर – पूर्वेस आहे. तेल्हारा तालुक्याचे सर्वात उत्तर-पूर्वेचं टोक म्हणजे वारी भैरवगड स्थान.

येथे वान या पूर्णा नदीच्या दक्षिण वाहिनी वान नावाच्या उपनदीवर धरण बांधण्यात आले आहे. या धरणामुळे तेल्हारा, अकोट आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव व संग्रामपूर तालुक्यांतील शेतीस जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत.

 सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले वारी हे तसे फार पुरातन ठिकाण. येथे हनुमान मंदिर आहे. या मारोतीची स्थापना रामदास स्वामींनी केल्याचे बोलले जाते.वान व वानची उपनदी यांच्या संगमावर उंचावर पर्वतपायथ्याशी मंदिर आहे. मंदिराचे व्यवस्थापन शिस्तबद्ध असल्यामुळे मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ असतो. मंदिरात मारोतीची १५ फुटी उभी मूर्ती आहे. अत्यंत सुंदर आणि विलोभनीय मूर्तीच्या पायाशी राक्षस असून हातावर द्रोणागीरी पर्वत आहे. या ठिकाणी हनुमान जयंती ला विशेष यात्रा असते. तसेच सोमवती अमावास्येला येथील संगमावर स्नान करून मारुतीचे दर्शन करायला भाविक येतात.

येथेच जवळ भैरवगड नावची अत्यंत जिर्णावस्थेतील गढीवजा इमारत आहे. या जागी पूर्वी गोंड राजांचा किल्ला असल्याचं बोललं जातं. आणि तो किल्ला नरनाळ्याचा उपविभाग म्हणून कार्यरत असल्याचं सांगतात. या किल्ल्याच्या बाबतीत अनेक जन आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

एका दिवसाच्या सहलीसाठी उत्तम असे हे ठिकाण असून , तेल्हाऱ्याला नोंद करून परवानगी घेतल्यास तुम्ही वान प्रकल्प सुद्धा पाहू शकता. वान धरणाच्या भिंतीवर उभे राहून ,दोन डोंगराच्या मधे पसरलेला तो विस्तीर्ण जलाशय पाहताना मन थक्क होतं. येथे लवकरच छोटा जलविद्युत प्रकल्प होण्याचं प्रस्तावित आहे.

अंतर :

तेल्हाऱ्यापासून ३० किमी,

अकोट पासून ३५ किमी,

अकोल्यापासून ७५ किमी.

योग्य वाहन : बस किंवा खाजगी वाहन.

संत गजानन महाराज, शेगाव March 11, 2006

Posted by neelkant in चित्रे, बातमी, माहिती.
8 comments

 SantaGajanan Maharaj

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या मंगलमय वास्तव्याने शेगाव नगरी पुनित झाली असून, श्री गजानन महाराज संस्थान शेगाव, हे श्रींच्या अलौकिक शक्तीचे प्रभावी शक्तिपीठ बनले आहे. समृद्धीची गंगा, सौजन्याची यमुना आणि सात्त्विकतेची सरस्वती यांचा “त्रीवेणी संगम” शेगावच्या पावन तीर्थात झालेला आहे. शेगाव हे सध्या भूवैकुंठ झालेले आहे. सत्संगाचे ते विद्यापीठ बनलेले आहे. संतसान्निध्याने ते सिध्दपीठ ठरले आहे. सिध्दटेक संत गजानन महाराज दिगंबरावस्थेत माघ वद्य ७ शके १८०० , दि. २३-२-१८८७ रोजी माध्यान्ह समयी प्रगट झाले व आपल्या अलौकिक दिव्य सामर्थ्याने अनेक लीला करून अतर्क्य वाटणारे चमत्कार करून असंख्य जीवांचा उद्धार करून भाद्रपद शु.५ शके १८३२ , दि. ८-९-१९१० रोजी शेगावच्या या पुण्यभूमीत समाधिस्त झाले .

संत गजानन महाराजांच्या विषयी अधीक माहीती खालील संकेत स्थळांतून आपणास मिळेल.

http://www.deshonnati.com/santgajanan/index.htm (website in Marathi)
http://www.gajananmaharaj.org/ (sansthan’s Official website)
http://www.gajanandarshan.com/
http://www.gajanan-shegaon.com/

महात्मा ज्योतीबा फुले March 8, 2006

Posted by neelkant in माहिती, व्यक्ती परिचय.
4 comments

mahatma Phule

१८२८ – जन्म कटगूण सातारा

१८३४ ते १८३८ – पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.

१८४० – सावित्रीबाईंशी विवाह.

१८४१ ते १८४७ – स्कॉटिश मिशन हाय स्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले

१८४७-  लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

१८४७ – थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास.

१८४८ – मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला

१८४८ – भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

७ सप्टेंबर १८५१ – चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरवात.

१८५२ – पुना लायब्ररीची स्थापना.

१५ मार्च १८५२ – वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

१६ नोहेंबर १९५२ – मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकार तर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

१८५३ – ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स’

१८५४ – स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली

१८५५ – रात्र शाळेची सुरवात केली

१८५६ – मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

१८५८ – शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

१८६० – विधवा विवाहास साहाय्य केले.

१८६३ – बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

१८६५ – विधवा केशवपणा विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

१८६४ – गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला.

१८६८ – दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

१८७३ – सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१८७५ – शेतकऱ्यांच्या शोषणा विरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

१८७५-  स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

१८७६ ते १८८२ – पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

१८८० – दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

१८८२ – ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा’ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

१८८७ – सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरवात केली

१८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

१८८८ – मुंबईतील कोळीवाडा येथे रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते जनते तर्फे सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान करण्यात आली. २८ नोव्हेंबर १८९० – पुणे येथे निधन झाले.

ज्योतीरावांची ग्रंथसंपदा

 नाव  साहित्यप्रकार  लेखन काळ
 १) तृतीय रत्न  नाटक १८५५ 
 २) छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा  पोवाडा  १८६९
 ३) ब्राह्मणांचे कसब    १८६९
 ४)गुलामगिरी    १८७३
 ५)शेतकऱ्यांचा आसूड    १८८३
 ६)सत्सार१     सत्सार २     १८८५
 ७)इशारा    १८८५
८)सार्वजनिक सत्यधर्म    ग्रंथ  १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशीत )
 ९)अखंड  काव्य रचना  
  • गुलामगिरी‘ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला.
  • ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
  • मूळ गाव – कटगुण (सातारा)
  • गोऱ्हे हे मूळ आडनाव.
  • ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
  • सावित्रीबाईंना प्रशिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.
  • सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत.
  • स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
  • १८८० – नारायण मेधाजी लोखंडे यांना ‘मील हॅण्ड असोसिएशन’ या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

बाबा आमटे March 6, 2006

Posted by neelkant in माहिती, विदर्भ, व्यक्ती परिचय.
add a comment

Baba Amte  

बाबा आमटे

मुरलीधर देवीदास आमटे

जन्म – १९१४

१९५८ – रॅमन मॅगसेसे पुरस्कार

१९८६ – पद्मविभूण, पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार

१९८८ – मानवी हक्क पुरस्कार .

१९९० – टेंपल्ट पुरस्कार .

१९९१ – राईट लाइव्हली हुड पुरस्कार .

पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार .

१९९९ – म. गांधी पुरस्कार .

 कुष्ठरोग्यांसाठी संस्था स्थापन केल्या –

सोमनाथ – मूल(चंद्रपूर)

आनंदवन – वरोरा (चंद्रपूर)

अशोकवन – नागपूर

नागेपल्ली , हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प. 

‘ज्वाला आणि फुले’ हा काव्यसंग्रह

‘उज्ज्वल उद्यासाठी’ (काव्य)

‘माती जागवील त्याला मत’

थोर समाजसुधारक

कुष्ठरोग निर्मूलन , पुनर्वसन

आनंदवन मूळच्या खडकाळ जमीनीत शेतीविषयक विविध प्रयोग.

राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते

१९८५ – शंभर दिवसांचे भारत जोडो आंदोलन .

नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व

सामाजिक नैसर्गिक पर्यावरण क्षेत्रात सक्रिय कार्य.

डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) March 6, 2006

Posted by neelkant in माहिती, विदर्भ, व्यक्ती परिचय.
add a comment

Dr. Panjabrao Deshmukh

मूळ आडनाव – कदम

जन्म – २७ डिसेंबर १८९८, पापळ (अमरावती ) येथे

मृत्यू – १० एप्रिल १९६५ दिल्ली येथे.

१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र चालविले.

वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.

१९३३ – शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.

१९२६ – मुष्ठीफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.

१९२७ – शेतकरी संघाची स्थापना.

१९३२ – श्री. ए. डब्ल्यु. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .

ग्रामोध्दार मंडळाची स्थापना.

१९५० – लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.

१९५५ – भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.

१९५६ – अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.

‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’.

१८ ऑगस्ट १९२८ – अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .

१९३० – प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री

लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.

१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषीमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.

देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.

१९६० – दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.