समाजाचा विकास कसा होतो? August 16, 2007
Posted by neelkant in मनोगतावरचे लिखाण, माहिती, विदर्भ.8 comments
येथे (इन्टरनेटवर) अनेक प्रदेशातील आणि जगातील अनेक प्रांत पाहिलेले लोक आहेत. जगभ्रमंतीने अथवा अनुभवाने आपली समाजाविषयी काही मते तयार होतात. त्यापैकी मला आज समाजाच्या विकासाची कारणे हवी आहेत.
समाज विकास म्हणजे काय? हा वाद नको म्हणून मी या चर्चेची पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राचा पुर्वेकडचा भाग म्हणजे विदर्भ ! हा भाग इतर महाराष्ट्राच्या , विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने मागे आहे. मागे म्हणजे येथे औद्योगीक विकास नाही,दरडॊई उत्पन्न कमी आहे,शिक्षणाच्या आणि पर्यायाने नोकरीच्या संधी कमी आहेत. शेती कायम तोट्यात आणि आता तर परिस्थीती अधिकच भयावह होत आहे. एक तर पाणी पडत नाही आणि पडले तर या वर्षीसारखे भरपूर की जी रोपटी रुजलीत ती कुजून गेली.
शेतकायांच्या आत्महत्या, मेळघाटाचे कुपोषण , गडचिरोलीचे नक्षलवादी आंदोलन आदी अनेक प्रश्न आऽ वासून उभे आहेत. सहकार रुजत नाही, सरकार बधत नाही, तरुणांना उमेद आहे पण लोक प्रतिनीधी अथवा जेष्ठ लोक त्याला विधायक वळण देताना दिसत नाहीत.
यात काही आशेच्या गोष्टी म्हणजे आता समाजातून स्वत:हून समोर येऊन कामे होताना दिसत आहेत. मेळघाट आणि गडचिरोलीला लोकसहभागातून कामे होताहेत. सामाजीक चळवळीतून उदयास आलेले बच्चू कडू सारखे नवीन राजकिय नेतृत्व लाभते आहे. पण हे अजूनही प्रायोगीक स्तरावत म्हणावे एवढे लहान आहे.
मी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात फिरतो तेव्हा एक संपन्नतेचं चित्र दिसतं. मात्र जेव्हा याप्रदेशाने ‘विकास करायचा असे ठरवून’ वाटचाल केली असेल. तेव्हाचा, सुरवातीचा काळ तर नक्कीच कठीण असेल ना ? कारण नैसर्गीक संपत्तीत विदर्भ महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत होता आणि आहे, मग तरी सुध्दा हा मानवी विकासाचा असमतोल का? कदाचीत कुठेतरी सामाजीक जडणघडण वेगळी असावी.सामाजीक जाणीव वेगळी असावी आणि ती ‘त्या’ पहिल्या पिढीने ‘जीने’ हा विकास करण्याचे स्वप्न पाहिले त्यांनी ही मुल्ये समाजात जाणीवपुर्वक रुजवीले असतील. तो प्रवास कसा झाला असेल?
यावरून अनेक प्रश्न निर्माण होताहेत. मी जेव्हा मुंबईत जातो तेव्हा वातावरणात सर्वत्र एक उर्जा असल्याचा भास होतो. मुंबईकरांची जगण्याची धडपड आणि त्यासाठी ५:१७ ची स्लो आणि ११:३ची फास्ट अश्या चर्चा. आदी सर्वांचा एक सार्वत्रीक प्रभाव असा दिसतो की प्रत्येकाला एक व्हिजन आहे – विकास ! स्वत:चा विकास!! मुंबईकर भारताचा अथवा समाजाचा विचार करीतच असेल असं नाही पण पर्यायाने समाजाचा आणि भारताचा विकास तर होतोच आहे ना? निदान असा स्वत:चा विकास करण्याची किमाण चेतना तरी कशी जागवता येईल?
पुण्यात असल्यावर या शहराच्या संस्कृतीचा आणि ती संस्कृती निर्माण आणि सांभाळ करण्याच्या जवाबदारीचं जे भान पुण्याला आहे , त्या बद्दल नक्कीच नवल वाटतं. संस्कृती सांभाळनं म्हणजे अगदीच काही अठराव्या शतकात जावं लागत नाही. एकविसाव्या शतकाशी जुळवून घेऊन नव्हे; त्यात अग्रेसर राहून सुध्दा आपली संस्कृती जपता येते हे पुण्याकडून शिकावं. विदर्भाला आपली एक संस्कृती आहे आणि संस्कृती जतन करण्यासाठी काही तरी स्वत:हून करावं लागतं याचं भान काही साहित्यीकांना आणि त्यांच्या पुस्तकांनाच तेवढं असल्याचं जाणवतं.
काय करावं? जातींपातीच्या जेष्ठश्रेष्ठतेत विदर्भाच्या सहकाराचा बळी गेला. राजकारणी इथून तिथून सारखेच, पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी आंब्याचं झाड लावतात ते मोठं करतात आणि आंबे खातात , पण निदान त्या झाडाची पाने लोकांपर्यंत पोहचतात.विदर्भातील राजकारणी आंब्याचं रोप लावतात, त्याला पाने लागताच ओरबाडून खातात, मग ते रोपच करपतं. लोक शहारतात आणि पुन्हा कुठलंच रोप लावल्या जात नाही. कुणी लावण्यास गेलाच तर त्याला विरोध होतो. आमच्या कित्येक सहकारी सुत गीरण्या ज्यांचं बीजभांडवलच आमचे राजकारणी गडप करून बसलेत. त्या या विधानाची सत्यता पटवतील. सगळीच निराशा ! सगळीच हताशा !!
पण… पण आता एक आशा आहे. आता जो विदर्भाचा तरुण आहे तो मात्र आता पुढं सरसावतोय. जो जिथं असेल तो तिथून काही तरी करू इच्छीतो. शिक्षणासाठी, नोकरीसाठी घर सोडून बाहेर गेलेले तरूण.आपल्या विदर्भासाठी काही करत आहेत. विदर्भातील तरूण प्रत्यक्ष काम करायला सरसावले आहेत. त्यांच्यात उमेद आहे,उत्साह आहे. आता मात्र हा प्रयोग फसायला नको… येत्या १० वर्षात विदर्भाचा कायापालट व्हायला हवा. त्यासाठी हवी असलेली जागृती होते आहे. याला दुर्दैव म्हणा अथवा काहीही… पण वेगळ्या विदर्भाची चळवळ सुध्दा ही जाणीव जागृत करण्याकरीता सहाय्यीभूत झाली आहे. अर्थात सामान्य विदर्भीय जनता हा राजकारण्याचा खुर्ची बचावाचा प्रकार आहे हे पुरतं जाणून आहे.
आता गरज आहे ती अनूभवी लोकांच्या सल्ल्याची. कुणाला काही सुचतंय का? जे काही असेल जसं काही असेल तसं. पण कामात येईल असं. आम्ही वाट पाहतो आहोत. तुमचा अनुभव आणि अनुभवातून आलेलं शहानपण आम्हाला पुन्हा पुन्हा त्याच चुका करण्यापासून थांबवेल. येथे काही महत्वाच्या सुचना आल्यास विदर्भातील वर्तमानपत्रांतून त्या प्रकाशीत करून सर्वत्र पोहचवण्याचा मानस आहे.
अमरावती जिल्हा October 25, 2006
Posted by neelkant in माहिती, विदर्भ.10 comments
क्षेत्रफळ
१२२१० चौ.कि.मी.
इतिहास:-
१८५३ च्या कराराद्वारे हैदराबादच्या निजामाने अमरावती जिल्ह्यासहित सर्व बेरार (वऱ्हाड / विदर्भ) ईस्ट इंडिया कंपनीकडे सुपूर्द केला. कंपनीने वहाड प्रांताचे दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन केले – १)दक्षिण वऱ्हाड – त्याचे मुख्यालय हिंगोली येथे होते.
२)पूर्व वऱ्हाड – उत्तर वऱ्हाडाचे रुपांतर पूर्व वऱ्हाडात करण्यात आले.त्याचे मुख्यालय अकोला येथे होते.
१८६४ मध्ये अमरावती मधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला. १९०३ मध्ये निजामाने वऱ्हाड ब्रिटिश भारत सरकारकडे कायमस्वरूपी सुपूर्द केला.(ईस्ट इंडिया कंपनीला तो काही कालावधीसाठीच देण्यात आला होता.) १९०३ मध्ये वऱ्हाड मध्यप्रांताला जोडण्यात आला. आणि मध्यप्रांत व बेरार असा मोठा प्रांत निर्माण करण्यात आला. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन याने वऱ्हाड मुंबई प्रांतास जोडण्यास नकार दिला. मराठी भाषिकांमध्ये प्रांतिक फूट पाडणे हा त्याचा हेतू होता. १९५६ मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. १९६० मध्ये महाराष्ट्र व गुजरात वेगळा झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. अमरावती जिल्हा दख्खनच्या पठारावर पूर्णपणे स्थानबद्ध आहे.
प्रशासकीय विभाग
– जिल्ह्याचे विभाजन १४ तालुके आणि ६ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.
१)अमरावती – अमरावती, भातकुली, नांदगाव(खंडेश्वर).
२)दर्यापुर – दर्यापूर, अंजनगाव.
३)अचलपूर – अचलपूर, चांदूर बाजार.
४)मोर्शी- मोर्शी, वरुड.
५)धारणी – धारणी, चिखलदरा.
६)चांदूर(रेल्वे)- चांदूर(रेल्वे),धामनगाव, तोईसा.
प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असं सांगतात.
अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचं नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. १९४६ साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली. १९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे. १८९७ चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सी. शंकरन नायर हे होते.
अमरावती जिल्ह्याला अकोला,यवतमाळ, वर्धा , अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत.अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील अग्रगण्य संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते.
पर्यटनस्थळ
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे.अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदऱ्याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.
सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून ८ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरमपाण्याचे झरे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षण आहेत.
विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महानुभाव पंथीयांचे हे सर्वात प्रमुख तिर्थस्थळ आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.
अचलपुर तालुक्यातील बहीरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. येथे बहीरम (भैरव) या देवाची पुजा केली जाते. येथे दरवर्षी महिनाभर जत्रा चालते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांत प्रसिद्ध आहे.
अमरावती जिल्ह्यातील महत्वाचे पीक कापूस हे आहे. पूर्णा, तापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. वर्धा नदीवर सिंबोराजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. शहानुर नदीवर शहानुर प्रकल्प आहे. अमरावती शहरात वडाळी तलाव व छत्री तलावातून पाणी पुरवठा होतो.
अमरावती येथे रासायनिक खताचा कारखाना आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये रेगूर ही काळी मृदा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. १९४२ च्या चळवळीत या जिल्ह्याचे महत्वाचे योगदान आहे. ब्रिटिशांच्या दडपशाहीने जिल्हा हादरून गेला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर थाप मारून जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय आंदोलनास प्रेरित केले. ..
पर्यटन :
चिखलदरा या ठिकाणाचे उल्लेख महाभारतात आढळतात. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला ‘किचकदरा’ असे नाव पडले, त्यावरूनच पुढे ते चिखलदरा झाले. महाराष्ट्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश म्हणून चिखलदरा ओळखला जातो. आताशा येथे मध व स्ट्रॉबेरी चे सुद्धा उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतल्या जात आहे. मेळघाट हा जंगलव्याप्त परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्या गेला आहे. १९७२ ला घोषित केल्यागेलेल्या देशातील १५ व्याघ्रप्रकल्पांतील हा एक. येथे १०० हून अधिक वाघ आहेत. वाघांव्यतिरिक्त हा प्रदेश चित्ते, अस्वल, सांबर, रानडुक्कर, जंगलीकुत्रे , मोर आदींसाठी प्रसिद्ध आहे.
चिखलदऱ्या जवळची काही आकर्षण केंद्रे :
१) मेळघाट व्याघ्रप्रकल्प , कोलखास आणि सीमाडोह हे निसर्गरम्य स्थळे.
२)गावीलगड किल्ला.
३)नर्नाळा किल्ला.
४)पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन
५)ट्रायबल म्युझीयम
अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण पॅराग्लाईडींगसाठी हळूहळू उदयास येत आहे. भारतात पॅराग्लाईडींग मोजक्याच ठिकाणी होतं. महाराष्ट्रातील हे तिसरे ठिकाण आहे.
शिक्षण:-
जिल्ह्यात तीन अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.
१) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
२)V.Y.W.S. अभियांत्रिकी महाविद्यालय , अमरावती
३)सीपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
वैद्यकीय महाविद्यालये –
१) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती.
२)विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती.
३)V.Y.W.S. दंतशल्यचिकित्सा महाविद्यालय, अमरावती.
४)श्री वल्लभ तखतमल होमीओपेथी महाविद्यालय, अमरावती.
५)पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ होमियोपेथीक मेडिकल सायन्सेस, अमरावती.
शारीरिक शिक्षण
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती.
ही शारीरिक शिक्षण क्षेत्रात जागतिक मान्यता असलेली संस्था म्हणजे अमरावतीचं भूषण आहे. जागतिक दर्जाच्या खेळ सुविधा येथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. येथे शारीरिक शिक्षणाचा पदवी अभ्यासक्रम चालवल्या जातो.
शिक्षण:
प्राथमिक शाळा: १७७८ माध्यमिक शाळा: ३६४ महाविद्यालये : ३६ अध्यापक विद्यालये: ८ आदिवासी आश्रमशाळा: ३६ अभियांत्रिकी महाविद्यालये : ३ तंत्रनिकेतन : ६ औद्योगिक प्रशिक्षण संस्था: २ वैद्यकीय महाविद्यालये: ५
आरोग्य:
जिल्हा सामान्य रुग्णालय: १ जिल्हा स्त्री रुग्णालय : १ जिल्हा क्षय रुग्णालय : १ प्राथमिक आरोग्य केंद्र : ५६ ग्रामीण कुटुंब केंद्र : १४
पिके
पिका खालील क्षेत्र : ८०१ हजार हेक्टर
ओलीत क्षेत्र : ६२ हजार हेक्टर
जलसिंचन :
मोठे प्रकल्प – १ मध्यम प्रकल्प – २ लाभक्षेत्र : १६ हजार हेक्टर शेती पतसंस्था : ३८१
वारी भैरवगड August 28, 2006
Posted by neelkant in माहिती, विदर्भ.add a comment
वारी भैरवगड तेल्हारा तालुका अकोला जिल्ह्याच्या उत्तर – पूर्वेस आहे. तेल्हारा तालुक्याचे सर्वात उत्तर-पूर्वेचं टोक म्हणजे वारी भैरवगड स्थान.
येथे वान या पूर्णा नदीच्या दक्षिण वाहिनी वान नावाच्या उपनदीवर धरण बांधण्यात आले आहे. या धरणामुळे तेल्हारा, अकोट आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव व संग्रामपूर तालुक्यांतील शेतीस जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत.
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले वारी हे तसे फार पुरातन ठिकाण. येथे हनुमान मंदिर आहे. या मारोतीची स्थापना रामदास स्वामींनी केल्याचे बोलले जाते.वान व वानची उपनदी यांच्या संगमावर उंचावर पर्वतपायथ्याशी मंदिर आहे. मंदिराचे व्यवस्थापन शिस्तबद्ध असल्यामुळे मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ असतो. मंदिरात मारोतीची १५ फुटी उभी मूर्ती आहे. अत्यंत सुंदर आणि विलोभनीय मूर्तीच्या पायाशी राक्षस असून हातावर द्रोणागीरी पर्वत आहे. या ठिकाणी हनुमान जयंती ला विशेष यात्रा असते. तसेच सोमवती अमावास्येला येथील संगमावर स्नान करून मारुतीचे दर्शन करायला भाविक येतात.
येथेच जवळ भैरवगड नावची अत्यंत जिर्णावस्थेतील गढीवजा इमारत आहे. या जागी पूर्वी गोंड राजांचा किल्ला असल्याचं बोललं जातं. आणि तो किल्ला नरनाळ्याचा उपविभाग म्हणून कार्यरत असल्याचं सांगतात. या किल्ल्याच्या बाबतीत अनेक जन आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
एका दिवसाच्या सहलीसाठी उत्तम असे हे ठिकाण असून , तेल्हाऱ्याला नोंद करून परवानगी घेतल्यास तुम्ही वान प्रकल्प सुद्धा पाहू शकता. वान धरणाच्या भिंतीवर उभे राहून ,दोन डोंगराच्या मधे पसरलेला तो विस्तीर्ण जलाशय पाहताना मन थक्क होतं. येथे लवकरच छोटा जलविद्युत प्रकल्प होण्याचं प्रस्तावित आहे.
अंतर :
तेल्हाऱ्यापासून ३० किमी,
अकोट पासून ३५ किमी,
अकोल्यापासून ७५ किमी.
योग्य वाहन : बस किंवा खाजगी वाहन.
बाबा आमटे March 6, 2006
Posted by neelkant in माहिती, विदर्भ, व्यक्ती परिचय.add a comment
बाबा आमटे
मुरलीधर देवीदास आमटे
जन्म – १९१४
१९५८ – रॅमन मॅगसेसे पुरस्कार
१९८६ – पद्मविभूण, पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार
१९८८ – मानवी हक्क पुरस्कार .
१९९० – टेंपल्ट पुरस्कार .
१९९१ – राईट लाइव्हली हुड पुरस्कार .
पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार .
१९९९ – म. गांधी पुरस्कार .
कुष्ठरोग्यांसाठी संस्था स्थापन केल्या –
सोमनाथ – मूल(चंद्रपूर)
आनंदवन – वरोरा (चंद्रपूर)
अशोकवन – नागपूर
नागेपल्ली , हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प.
‘ज्वाला आणि फुले’ हा काव्यसंग्रह
‘उज्ज्वल उद्यासाठी’ (काव्य)
‘माती जागवील त्याला मत’
थोर समाजसुधारक
कुष्ठरोग निर्मूलन , पुनर्वसन
आनंदवन मूळच्या खडकाळ जमीनीत शेतीविषयक विविध प्रयोग.
राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते
१९८५ – शंभर दिवसांचे भारत जोडो आंदोलन .
नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व
सामाजिक नैसर्गिक पर्यावरण क्षेत्रात सक्रिय कार्य.
डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) March 6, 2006
Posted by neelkant in माहिती, विदर्भ, व्यक्ती परिचय.add a comment
मूळ आडनाव – कदम
जन्म – २७ डिसेंबर १८९८, पापळ (अमरावती ) येथे
मृत्यू – १० एप्रिल १९६५ दिल्ली येथे.
१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र चालविले.
वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
१९३३ – शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
१९२६ – मुष्ठीफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
१९२७ – शेतकरी संघाची स्थापना.
१९३२ – श्री. ए. डब्ल्यु. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .
ग्रामोध्दार मंडळाची स्थापना.
१९५० – लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.
१९५५ – भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
१९५६ – अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’.
१८ ऑगस्ट १९२८ – अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
१९३० – प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषीमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.
देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
१९६० – दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.
रामटेक February 28, 2006
Posted by neelkant in माहिती, विदर्भ.add a comment
राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवल्या गेले. नागपूर पासून ५५ किमी वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. श्रीरामाचे सेना गण म्हणजे वानरांचा मुक्त संचार येथे आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे.
संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे ‘शाकुंतल’. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे.
या शहरा बद्दलचे आणखी एक आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांचे हे जन्मगाव . त्यांच्या राहत्या घराला संघाने एका स्मारकाचे स्वरूप दिले आहे. संपूर्ण भारतातून संघ स्वयंसेवक या घराला भेटी देतात.
रामटेक परिसरात नुकताच पुरातन बौद्ध संस्कृतीचा शोध लागला आहे. त्या परिसरात उत्खनन चालू आहे.
नागपुरावरून येथे येण्यासाठी सतत बस आहेत. व्यावसायिक वाहने सुद्धा उपलब्ध आहेत.
किल्ले नरनाळा February 26, 2006
Posted by neelkant in माहिती, विदर्भ.add a comment
अकोला जिल्ह्यातील हा अतिशय दुर्गम गिरिदुर्ग. अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्या पासुन याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासून गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.
गड जमीनीपासून ३१६१ फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून तेलीयागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.
गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळफुटाने वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.
गडावर आजही राणी महाल व बाजूची मस्जीत अस्तित्वात आहे. त्या समोरचा सभामंडप आता नसला तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतात. सरळ पुढे गेल्यास तेला- तूपाचे टाके लागतात. खोल टाक्या असून त्यात विभागणी केलेली आहे; आणि त्यांना युध्दकाळात तेल-तूप साठवण्यासाठी वापरल्या जात असे.
गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर ‘नऊगजी तोफ’ दिसते. ही तोफ अष्टधातुची असून इमादशहाच्या काळात गडावर आणल्या गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. तोफेचे तोंड गडपायथ्याच्या शहानुर गावाकडे रोखलेले आपणास लक्षात येते. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोऱ्यात चंदन व साग झाडांची फार दाट पसरण आहे.
गड नेमका कुणी आणि कोणत्या काळात बांधला या बाबत नक्की माहिती नाही पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्या वरून हा गड ‘गोंड राजांनी’ बांधला असल्याचे बोलले जाते. गडावर नागपूरकर भोसले कालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहीत हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातुन येणाऱ्या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
संत गाडगे महाराज February 18, 2006
Posted by neelkant in माहिती, विदर्भ.5 comments
जन्मगाव- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव .
जन्मदिनांक – २३ फेब्रुवारी १८७६
मुळनाव – डेबुजी झिंगराजी जानोरकर
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी ‘लक्ष्मीनारायणाचे’मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.
१९२५- मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले.
“मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही” असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
८ फेब्रुवारी १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन’ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ – ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.
आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात’
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- जे.जे. हॉस्पिटल धर्मशाळा ( मुंबई) बांधली.
गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.
गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.