jump to navigation

समाजाचा विकास कसा होतो? August 16, 2007

Posted by neelkant in मनोगतावरचे लिखाण, माहिती, विदर्भ.
8 comments

येथे (इन्टरनेटवर) अनेक प्रदेशातील आणि जगातील अनेक प्रांत पाहिलेले लोक आहेत. जगभ्रमंतीने अथवा अनुभवाने आपली समाजाविषयी काही मते तयार होतात. त्यापैकी मला आज समाजाच्या विकासाची कारणे हवी आहेत.

समाज विकास म्हणजे काय? हा वाद नको म्हणून मी या चर्चेची पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्राचा पुर्वेकडचा भाग म्हणजे विदर्भ ! हा भाग इतर महाराष्ट्राच्या , विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने मागे आहे. मागे म्हणजे येथे औद्योगीक विकास नाही,दरडॊई उत्पन्न कमी आहे,शिक्षणाच्या आणि पर्यायाने नोकरीच्या संधी कमी आहेत. शेती कायम तोट्यात आणि आता तर परिस्थीती अधिकच भयावह होत आहे. एक तर पाणी पडत नाही आणि पडले तर या वर्षीसारखे भरपूर की जी रोपटी रुजलीत ती कुजून गेली.

शेतकायांच्या आत्महत्या, मेळघाटाचे कुपोषण , गडचिरोलीचे नक्षलवादी आंदोलन आदी अनेक प्रश्न आऽ वासून उभे आहेत. सहकार रुजत नाही, सरकार बधत नाही, तरुणांना उमेद आहे पण लोक प्रतिनीधी अथवा जेष्ठ लोक त्याला विधायक वळण देताना दिसत नाहीत.

यात काही आशेच्या गोष्टी म्हणजे आता समाजातून स्वत:हून समोर येऊन कामे होताना दिसत आहेत. मेळघाट आणि गडचिरोलीला लोकसहभागातून कामे होताहेत. सामाजीक चळवळीतून उदयास आलेले बच्चू कडू सारखे नवीन राजकिय नेतृत्व लाभते आहे. पण हे अजूनही प्रायोगीक स्तरावत म्हणावे एवढे लहान आहे.

मी जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात फिरतो तेव्हा एक संपन्नतेचं चित्र दिसतं. मात्र जेव्हा याप्रदेशाने ‘विकास करायचा असे ठरवून’ वाटचाल केली असेल. तेव्हाचा, सुरवातीचा काळ तर नक्कीच कठीण असेल ना ? कारण नैसर्गीक संपत्तीत विदर्भ महाराष्ट्रात सर्वात श्रीमंत होता आणि आहे, मग तरी सुध्दा हा मानवी विकासाचा असमतोल का? कदाचीत कुठेतरी सामाजीक जडणघडण वेगळी असावी.सामाजीक जाणीव वेगळी असावी आणि ती ‘त्या’ पहिल्या पिढीने ‘जीने’ हा विकास करण्याचे स्वप्न पाहिले त्यांनी ही मुल्ये समाजात जाणीवपुर्वक रुजवीले असतील. तो प्रवास कसा झाला असेल?

यावरून अनेक प्रश्न निर्माण होताहेत. मी जेव्हा मुंबईत जातो तेव्हा वातावरणात सर्वत्र एक उर्जा असल्याचा भास होतो. मुंबईकरांची जगण्याची धडपड आणि त्यासाठी ५:१७ ची स्लो आणि ११:३ची फास्ट अश्या चर्चा. आदी सर्वांचा एक सार्वत्रीक प्रभाव असा दिसतो की प्रत्येकाला एक व्हिजन आहे – विकास ! स्वत:चा विकास!! मुंबईकर भारताचा अथवा समाजाचा विचार करीतच असेल असं नाही पण पर्यायाने समाजाचा आणि भारताचा विकास तर होतोच आहे ना? निदान असा स्वत:चा विकास करण्याची किमाण चेतना तरी कशी जागवता येईल?

पुण्यात असल्यावर या शहराच्या संस्कृतीचा आणि ती संस्कृती निर्माण आणि सांभाळ करण्याच्या जवाबदारीचं जे भान पुण्याला आहे , त्या बद्दल नक्कीच नवल वाटतं. संस्कृती सांभाळनं म्हणजे अगदीच काही अठराव्या शतकात जावं लागत नाही. एकविसाव्या शतकाशी जुळवून घेऊन नव्हे;  त्यात अग्रेसर राहून सुध्दा आपली संस्कृती जपता येते हे पुण्याकडून शिकावं. विदर्भाला आपली एक संस्कृती आहे आणि संस्कृती जतन करण्यासाठी काही तरी स्वत:हून करावं लागतं याचं भान काही साहित्यीकांना आणि त्यांच्या पुस्तकांनाच तेवढं असल्याचं जाणवतं.

काय करावं? जातींपातीच्या जेष्ठश्रेष्ठतेत विदर्भाच्या सहकाराचा बळी गेला. राजकारणी इथून तिथून सारखेच, पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी आंब्याचं झाड लावतात ते मोठं करतात आणि आंबे खातात , पण निदान त्या झाडाची पाने लोकांपर्यंत पोहचतात.विदर्भातील राजकारणी आंब्याचं रोप लावतात, त्याला पाने लागताच ओरबाडून खातात, मग ते रोपच करपतं. लोक शहारतात आणि पुन्हा कुठलंच रोप लावल्या जात नाही. कुणी लावण्यास गेलाच तर त्याला विरोध होतो. आमच्या कित्येक सहकारी सुत गीरण्या ज्यांचं बीजभांडवलच आमचे राजकारणी गडप करून बसलेत. त्या या विधानाची सत्यता पटवतील.  सगळीच निराशा ! सगळीच हताशा !!

पण… पण आता एक आशा आहे. आता जो विदर्भाचा तरुण आहे तो मात्र आता पुढं सरसावतोय. जो जिथं असेल तो तिथून काही तरी करू इच्छीतो. शिक्षणासाठी, नोकरीसाठी घर सोडून बाहेर गेलेले तरूण.आपल्या विदर्भासाठी काही करत आहेत. विदर्भातील तरूण प्रत्यक्ष काम करायला सरसावले आहेत. त्यांच्यात उमेद आहे,उत्साह आहे. आता मात्र हा प्रयोग फसायला नको… येत्या १० वर्षात विदर्भाचा कायापालट व्हायला हवा. त्यासाठी हवी असलेली जागृती होते आहे. याला दुर्दैव म्हणा अथवा काहीही… पण वेगळ्या विदर्भाची चळवळ सुध्दा ही जाणीव जागृत करण्याकरीता सहाय्यीभूत झाली आहे. अर्थात सामान्य विदर्भीय जनता हा राजकारण्याचा खुर्ची बचावाचा प्रकार आहे हे पुरतं जाणून आहे.

आता गरज आहे ती अनूभवी लोकांच्या सल्ल्याची. कुणाला काही सुचतंय का? जे काही असेल जसं काही असेल तसं. पण कामात येईल असं. आम्ही वाट पाहतो आहोत. तुमचा अनुभव आणि अनुभवातून आलेलं शहानपण आम्हाला पुन्हा पुन्हा त्याच चुका करण्यापासून थांबवेल. येथे काही महत्वाच्या सुचना आल्यास विदर्भातील वर्तमानपत्रांतून त्या प्रकाशीत करून सर्वत्र पोहचवण्याचा मानस आहे.

मराठी आणि संगणक क्रांती. August 16, 2007

Posted by neelkant in मनोगतावरचे लिखाण, माहिती.
4 comments

नमस्कार मराठी समाज संगणक क्रांतीमधे खुप पुढे आहे. मात्र मराठी खुप मागे. याची कारण मीमांसा प्रत्येकाने करायला हवी. आज या चर्चेचा उद्देश्य म्हणजे प्रत्येकाला करायला काहीतरी द्यावे हा आहे.

मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहीली जाते. युनिकोड नावाचे जे जगमान्य प्रमाण आहे, त्यामुळे मराठीच्या कळसंचाचा सार्वत्रीक गोंधळ दुर होण्यास मदत होईल असं वाटतं.

आता मात्र साफ्टवेअर आणि जमल्यास समग्र चालना प्रणाली मराठीत असावी अशी मागणी होते आहे. युनिकोड वापरून मराठी लिहीणाऱ्यांचे प्रमाण पाहता हे काम खुप कठीण आहे असं वाटत नाही. मात्र गरज आहे ती प्रेरणेची.  अनेक लोकांना नेमके काय करावे ते कळत नाही. या चर्चेद्वारे जाणकार नेमकं काय करावं ही माहिती देतील असं वाटतं.

मला माहित असलेले दोन प्रमुख मार्ग म्हणजे जे प्रोग्रामर आहेत त्यांनी मराठी केन्द्रस्थानी ठेवून निर्मीती करावी. जसे आपल्या ‘ओंकार जोशी’ यांनी ‘गमभन’ तयार केले. 

दुसरा म्हणजे आम्हा सामान्य लोकांचा , ज्यांना प्रोग्रामींग मधलं काही कळत नाही त्यांनी भाषांतराचं तितकंच महत्वाचं काम करावं. भाषांतर करण्यासाठी अनेक लोकांची गरज आहे. अनेक सॉफ्टवेअर असे आहेत की जे आपण सहज मराठीतून उपलब्ध करून देऊ शकतो. मी कुठेतरी असं वाचलं आहे की, पुरेश्या वाक्य संग्रहानंतर हे काम (भाषांतराचं) एका प्रोग्रामने सुध्दा करणे शक्य आहे. मात्र त्याला शेवटचा हात मानवी असणं गरजेचं असतं कारण भाषांतर हेच उपयोगकर्त्याशी थेट संपर्क साधते. त्यामुळे त्यात सहजता आणि संपुर्णता असणे आवश्यक आहे. याकरीता भरपुर मनुष्यबळ असने गरजेचे आहे.  आज मनोगतावर, जालनिशीवर आणि इतरत्र मराठीतून लिहीणाऱ्यांची मोठी संख्या पाहता हे अशक्य नाही. 

या दृष्टीने काही प्रयत्न सुरु झालेले आहेत . त्यांच्या विषयी खाली दुवे दिलेले आहेत. मग अडचन काय आहे?  तर अडचन ही आहे की ही कामे एका नावाखाली नाहीत , आधीच संख्येने कमी आणि त्यातही विलग त्यामुळे संवाद नाही. नविन सदस्यापुढे गोंधळ, कुणाला सामील व्हावे? खरं तर अनेक ग्रुप असने ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे नवीन कल्पनांना चालना मिळते. मात्र त्यांची संख्या वाढायला नको का? आणि हो या सर्व ग्रुप्सनी एकत्र येऊन काही भाषांतर प्रमाण ठरवायला हवेत. जसे फाईल या शब्दाला एक मराठी प्रतिशब्द नक्की करावा व तो प्रत्येक प्रकल्पात- प्रत्येक गटात कायम ठेवावा. या करीता आपल्याला मिलींद यांच्या शब्दसंग्रहाची मदत घेता येईल.

मी खाली काही ग्रुपचे आणि काही संकेतस्थळांचे दुवे देत आहे. तुमची माय मराठीसाठी काही करण्याची इच्छा असेल तर जरूर त्यांना सामील व्हा.

१) मराठीच्या भाषांतरनासोबतच त्याचे प्रमाणिकर्ण करने गरजेचे आहे. अन्यथा प्रत्येकाच्या आवडीने केलेले भाषांतर सामान्य उपयोगकर्त्याच्या अडचणीच केवळ वाढवेल. हे कसे करावे या करीता. एका अंकुर नावाच्या बंगाली ग्रुपचे संकेतस्थळ देत आहे. याचा उल्लेख जागतीक स्तरावर केला जातो. दुवा

२)आताश्या एक लिनक्स चे नवी आवृत्ती आलेली आहे. तीचं नाव उबंटू (उच्चार चुकल्यास सांगणे). या उबंटूचा मराठी भाषांतरणाचा प्रकल्प चालू आहे. तुम्ही त्या प्रकल्पाला सामील होऊ शकता. दुवा

या प्रकल्पातील मराठीची सद्यस्थीती तुम्ही येथे पाहू शकाल. दुवा२)एक देवनागरी नावाचा ग्रुप खुप आधीपासून या क्षेत्रात आहे. तेथे जरूर जा . दुवा

३)एक नवा चर्चा गट स्थापन झाला आहे. येथील प्रशासक खुप उत्साही आहेत. येथे तुम्ही सामील होऊ शकता . दुवा

4) मराठी मुक्तस्त्रोत ग्रुप याहूवर आहे. दुवा

मुक्त स्त्रोत चालना प्रणाली ही भारतीयांसाठी वरदान ठरेल असं म्हणतात. या क्षेत्रात भाषांतराची खुप गरज आहे. तेथे जरुर मदत करा. असे अनेक ग्रुप सध्या कार्यरत आहेत. आपणास काही माहीती असेल तर ती सुध्दा येथे द्यावी.

भारतातील प्रमुख संघटना August 16, 2007

Posted by neelkant in मनोगतावरचे लिखाण, माहिती.
add a comment

१) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – आज भारतात सर्वात जूनी आणि मोठी अशी संघटना आहे. जी आता राजकीय पक्ष म्हणून काम करते आणि गेल्या ६० वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील ५० वर्षे हाच पक्ष राज्यकर्ता होता. याची स्थापना १८८५ ला काही लोकांनी मिळून सरकाराला सनदी मार्गाने आपले अधिकार मागण्यासाठी केली. या संघटनेचे प्रवर्तक एक ब्रिटिश , सर ऍलन ह्युम होते. खरं तर भारतीयांच्या असंतोषाला एक सनदशीर मार्गाने वाटकरून देण्याचा हा प्रयत्न होता. त्यावेळचा व्हॉईसरॉय डफरीन याचे या प्रयत्नाला समर्थन होते. मात्र हा त्याचा सहभाग पुढे खूप काळ पर्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. पुढे या संघटनेचे विचार बदलले, संघटनेला आक्रमक रूप आले, संघटनेत समर्पित आणि आक्रमक सदस्यांची संख्या वाढली आणि सारा देश एकाच विचाराने एका संघटनेशी बांधल्या गेला. एकच विचार.

पुढे पुन्हा परिस्थिती बदली, तसा विचार बदलला , प्रमुखांनी सांगून सुद्धा संघटनेचं विलिनीकरण केलं नाही, त्याला राजकीय चाहूल तर आधीच लागलेली , मग त्या संघटनेचं राजकीय पक्षात रुपांतर केलं. या संघटनेचं स्वातंत्र्यानंतरचं स्वरूप आपल्या समोर आहेच. विशाल व्याप्ती असं या संघटनेचं जसं वैशिष्ट्य सांगता येतं ना ! तसंच फूट हे सुद्धा यां संघटनेचं एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. १९०७ पासून ते आजतागायत सतत काहीतरी पडझड या संघटनेत होतच आहे.

२)राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – भारतातील आजची प्रमुख स्वयंसेवी संघटना जी “संघशक्ती कलियुगे” असं मानते आणि तिचा १५ पेक्षा अधिक वेगवेगळ्या संघटनांच्या पसाऱ्याचा आवाका पाहता. भारतीय समाजजीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करण्याच्या त्यांच्या घोषणेत तथ्य वाटते.

१९२५ साली काही मुलांना घेऊन डॉ. हेडगेवारांनी नागपुराला या संघटनेची स्थापना केली. समग्र हिंदू संघटन हा विचारांचा मुख्य आधार. व्यक्ती- व्यक्ती संपर्क आणि रोज एक ठरावीक काळ एकत्र येणे हा मुख्य कार्यक्रम. एक संघटना म्हणून या संघटनेची संरचना आणि कार्यपद्धती अतिशय उत्तम आहे. शिस्त , ठराविक कार्यपद्धती आणि आपल्या विचारांवर अघाढ श्रद्धा ही वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. सुरवातीच्या काळातील कार्यकर्त्यांनी केलेले काम वाचलेकी लक्षात येईल की किती कठीण परिस्थितीतून ही संघटना बांधली गेलेली आहे.

या संघटनेचे प्रमुख खूप तज्ज्ञ असावेत. म्हणून त्यांनी समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी वेगळी ठेवण असलेली संघटना बांधलेली दिसून येते. या सर्वांतील सामायिक दुवा म्हणजे ही संघटना असे.

मात्र १९९६ पासून म्हणजेच यांच्या विचाराच्या संघटनेचं सरकार आल्या पासून मात्र या संघटनेत खुपसा बदल झालेला दिसून येतो. त्या आधी या संघटनेचा आणि सरकारातील त्या पक्षाचा काहीही संबंध नाही हे ठासून सांगितल्या जायचं. मात्र पक्ष सत्तेवर आल्यावर त्या पक्षाला प्रसिद्धी माध्यमातून आदेश देण्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. आणि आता पुन्हा हम आपके है कौण? सारखा प्रकार दिसून येतो.

संघटनेचा आधार जरी भक्कम असला तरी मुख्य काम काहींस दुर्लक्षिल्या जातंय असं वाटतं. असो. मात्र या संघटनेचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात गेल्या ७५ वर्षात कधीही फूट पडलेली नाही. कधीही एखादा गट बाहेर येऊन, समान नावाची(कंसात काहीतरी उल्लेख असलेली) दुसरी संघटना तयार केल्याचे झालेले नाही.

३)भारतीय कम्युनिस्ट पक्ष – १९२५ लाच निर्माण झालेली आणि आज पर्यंत प्रबळ अस्तित्व असलेली आणखी एक संघटना आहे. हिची स्थापना मानवेंद्रनाथ रॉय यांनी रशियात केली होती. मात्र याबाबत एकमत नाही. वर्ष मात्र नक्की. मानवेंद्रनाथ रॉय हे भारतीय इतिहासातील एक अनमोल रत्न.

वर्ग संकल्पनेवर आधारीत विचारधारा घेऊन ‘आहे-रे’ आणि ‘नाही-रे’ च्या गटातील; बहुसंख्य ‘नाही-रे’ या गटाचे प्रतिनिधित्व ही संघटना करते. जगात अनेक राष्ट्रांत हि विचारधारा पसरली. वाढली आणि बदलत्या काळासोबत बदलली(चीन) किंवा मोडकळीस निघाली(रशिया , आग्नेय आशिया) . मात्र भारतात बंगाल आणि केरळ या राज्यांत हिचे अस्तित्व प्रबळ आहे.

भूमिहीन मजूर , छोटे शेतकरी, कामगार आणि शोषीत घटक यांचे हितसंवर्धन करण्यासाठी स्थापन झालेल्या यां संघटनेचे कालांतराने काही वेगवेगळ्या संघटनांत रुपांतर झाले. मात्र मूळचा आक्रमक स्वभाव सर्वांत कायम आहे. अनेक संघटना याच विचाराशी नाते सांगतात. भारतात काही संवैधानीक मार्गाने काम करताहेत. तर काही हे संविधानच नाकारून व्यवस्था बदल करण्यासाठी सशस्त्र मार्गाने प्रयत्नशील आहेत. 

परस्पर विरोधी अशी काहीशी विचारसरणी असल्यावरही संघात आणि या संघटनेत एक सामायिक शक्तीस्थान आहे, ते म्हणजे समर्पित आणि तल्लख कार्यकर्ते. आपलं अवघं जीवन आपल्या विचाराच्या प्रचारा-प्रसारासाठी समर्पित करून समाजासाठी आयुष्यभर सतत काम करत राहणे हे या कार्यकर्त्यांचं जीवनकार्य. यांच्याच भरवशावर ह्या संघटना वाढताहेत. आणि लोकांचा विश्वास संपादन करताहेत. १९९६ साली संघाला आणि २००३ साली कम्युनिस्ट पक्षाला केंद्रात  सत्तासुख मिळताना दिसत आहे. हा योगायोग की काय?

येथे भारतातील इतरही काही संघटनांचा उल्लेख व्हायला हवा होता. मात्र आता थांबतो. त्या पैकी काहींचा नामोल्लेख जाता जाता करतो. रामकृष्ण मिशन , गुरुदेव सेवा मंडळ, समाजवादी (सगळे कंसातील सहीत) पक्ष, आसू सारख्या विध्यार्थी संघटना, बामसेफ , मराठा महासंघ, हिंदूमहासभा, हिंदू सेना आणि शिवसेना आदी.

प्रतापराव गुजर August 16, 2007

Posted by neelkant in कथा, मनोगतावरचे लिखाण, माहिती.
18 comments

कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.

एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर.

यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं.

पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.

बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता.  त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.

मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.

शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना  राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.  

महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.

अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे?  तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.

बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.

अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही !  प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.    

प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.

______________________________________

वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा वर दिली आहे.

प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी  शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी  गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.

महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले.

पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा.