भारतातील प्रमुख संघटना August 16, 2007
Posted by neelkant in मनोगतावरचे लिखाण, माहिती.trackback
१) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – आज भारतात सर्वात जूनी आणि मोठी अशी संघटना आहे. जी आता राजकीय पक्ष म्हणून काम करते आणि गेल्या ६० वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील ५० वर्षे हाच पक्ष राज्यकर्ता होता. याची स्थापना १८८५ ला काही लोकांनी मिळून सरकाराला सनदी मार्गाने आपले अधिकार मागण्यासाठी केली. या संघटनेचे प्रवर्तक एक ब्रिटिश , सर ऍलन ह्युम होते. खरं तर भारतीयांच्या असंतोषाला एक सनदशीर मार्गाने वाटकरून देण्याचा हा प्रयत्न होता. त्यावेळचा व्हॉईसरॉय डफरीन याचे या प्रयत्नाला समर्थन होते. मात्र हा त्याचा सहभाग पुढे खूप काळ पर्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. पुढे या संघटनेचे विचार बदलले, संघटनेला आक्रमक रूप आले, संघटनेत समर्पित आणि आक्रमक सदस्यांची संख्या वाढली आणि सारा देश एकाच विचाराने एका संघटनेशी बांधल्या गेला. एकच विचार.
पुढे पुन्हा परिस्थिती बदली, तसा विचार बदलला , प्रमुखांनी सांगून सुद्धा संघटनेचं विलिनीकरण केलं नाही, त्याला राजकीय चाहूल तर आधीच लागलेली , मग त्या संघटनेचं राजकीय पक्षात रुपांतर केलं. या संघटनेचं स्वातंत्र्यानंतरचं स्वरूप आपल्या समोर आहेच. विशाल व्याप्ती असं या संघटनेचं जसं वैशिष्ट्य सांगता येतं ना ! तसंच फूट हे सुद्धा यां संघटनेचं एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. १९०७ पासून ते आजतागायत सतत काहीतरी पडझड या संघटनेत होतच आहे.
२)राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – भारतातील आजची प्रमुख स्वयंसेवी संघटना जी “संघशक्ती कलियुगे” असं मानते आणि तिचा १५ पेक्षा अधिक वेगवेगळ्या संघटनांच्या पसाऱ्याचा आवाका पाहता. भारतीय समाजजीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करण्याच्या त्यांच्या घोषणेत तथ्य वाटते.
१९२५ साली काही मुलांना घेऊन डॉ. हेडगेवारांनी नागपुराला या संघटनेची स्थापना केली. समग्र हिंदू संघटन हा विचारांचा मुख्य आधार. व्यक्ती- व्यक्ती संपर्क आणि रोज एक ठरावीक काळ एकत्र येणे हा मुख्य कार्यक्रम. एक संघटना म्हणून या संघटनेची संरचना आणि कार्यपद्धती अतिशय उत्तम आहे. शिस्त , ठराविक कार्यपद्धती आणि आपल्या विचारांवर अघाढ श्रद्धा ही वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. सुरवातीच्या काळातील कार्यकर्त्यांनी केलेले काम वाचलेकी लक्षात येईल की किती कठीण परिस्थितीतून ही संघटना बांधली गेलेली आहे.
या संघटनेचे प्रमुख खूप तज्ज्ञ असावेत. म्हणून त्यांनी समाजाच्या प्रत्येक वर्गासाठी वेगळी ठेवण असलेली संघटना बांधलेली दिसून येते. या सर्वांतील सामायिक दुवा म्हणजे ही संघटना असे.
मात्र १९९६ पासून म्हणजेच यांच्या विचाराच्या संघटनेचं सरकार आल्या पासून मात्र या संघटनेत खुपसा बदल झालेला दिसून येतो. त्या आधी या संघटनेचा आणि सरकारातील त्या पक्षाचा काहीही संबंध नाही हे ठासून सांगितल्या जायचं. मात्र पक्ष सत्तेवर आल्यावर त्या पक्षाला प्रसिद्धी माध्यमातून आदेश देण्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. आणि आता पुन्हा हम आपके है कौण? सारखा प्रकार दिसून येतो.
संघटनेचा आधार जरी भक्कम असला तरी मुख्य काम काहींस दुर्लक्षिल्या जातंय असं वाटतं. असो. मात्र या संघटनेचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे यात गेल्या ७५ वर्षात कधीही फूट पडलेली नाही. कधीही एखादा गट बाहेर येऊन, समान नावाची(कंसात काहीतरी उल्लेख असलेली) दुसरी संघटना तयार केल्याचे झालेले नाही.
३)भारतीय कम्युनिस्ट पक्ष – १९२५ लाच निर्माण झालेली आणि आज पर्यंत प्रबळ अस्तित्व असलेली आणखी एक संघटना आहे. हिची स्थापना मानवेंद्रनाथ रॉय यांनी रशियात केली होती. मात्र याबाबत एकमत नाही. वर्ष मात्र नक्की. मानवेंद्रनाथ रॉय हे भारतीय इतिहासातील एक अनमोल रत्न.
वर्ग संकल्पनेवर आधारीत विचारधारा घेऊन ‘आहे-रे’ आणि ‘नाही-रे’ च्या गटातील; बहुसंख्य ‘नाही-रे’ या गटाचे प्रतिनिधित्व ही संघटना करते. जगात अनेक राष्ट्रांत हि विचारधारा पसरली. वाढली आणि बदलत्या काळासोबत बदलली(चीन) किंवा मोडकळीस निघाली(रशिया , आग्नेय आशिया) . मात्र भारतात बंगाल आणि केरळ या राज्यांत हिचे अस्तित्व प्रबळ आहे.
भूमिहीन मजूर , छोटे शेतकरी, कामगार आणि शोषीत घटक यांचे हितसंवर्धन करण्यासाठी स्थापन झालेल्या यां संघटनेचे कालांतराने काही वेगवेगळ्या संघटनांत रुपांतर झाले. मात्र मूळचा आक्रमक स्वभाव सर्वांत कायम आहे. अनेक संघटना याच विचाराशी नाते सांगतात. भारतात काही संवैधानीक मार्गाने काम करताहेत. तर काही हे संविधानच नाकारून व्यवस्था बदल करण्यासाठी सशस्त्र मार्गाने प्रयत्नशील आहेत.
परस्पर विरोधी अशी काहीशी विचारसरणी असल्यावरही संघात आणि या संघटनेत एक सामायिक शक्तीस्थान आहे, ते म्हणजे समर्पित आणि तल्लख कार्यकर्ते. आपलं अवघं जीवन आपल्या विचाराच्या प्रचारा-प्रसारासाठी समर्पित करून समाजासाठी आयुष्यभर सतत काम करत राहणे हे या कार्यकर्त्यांचं जीवनकार्य. यांच्याच भरवशावर ह्या संघटना वाढताहेत. आणि लोकांचा विश्वास संपादन करताहेत. १९९६ साली संघाला आणि २००३ साली कम्युनिस्ट पक्षाला केंद्रात सत्तासुख मिळताना दिसत आहे. हा योगायोग की काय?
येथे भारतातील इतरही काही संघटनांचा उल्लेख व्हायला हवा होता. मात्र आता थांबतो. त्या पैकी काहींचा नामोल्लेख जाता जाता करतो. रामकृष्ण मिशन , गुरुदेव सेवा मंडळ, समाजवादी (सगळे कंसातील सहीत) पक्ष, आसू सारख्या विध्यार्थी संघटना, बामसेफ , मराठा महासंघ, हिंदूमहासभा, हिंदू सेना आणि शिवसेना आदी.
Comments»
No comments yet — be the first.