वारी भैरवगड August 28, 2006
Posted by neelkant in माहिती, विदर्भ.add a comment
वारी भैरवगड तेल्हारा तालुका अकोला जिल्ह्याच्या उत्तर – पूर्वेस आहे. तेल्हारा तालुक्याचे सर्वात उत्तर-पूर्वेचं टोक म्हणजे वारी भैरवगड स्थान.
येथे वान या पूर्णा नदीच्या दक्षिण वाहिनी वान नावाच्या उपनदीवर धरण बांधण्यात आले आहे. या धरणामुळे तेल्हारा, अकोट आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव व संग्रामपूर तालुक्यांतील शेतीस जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत.
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले वारी हे तसे फार पुरातन ठिकाण. येथे हनुमान मंदिर आहे. या मारोतीची स्थापना रामदास स्वामींनी केल्याचे बोलले जाते.वान व वानची उपनदी यांच्या संगमावर उंचावर पर्वतपायथ्याशी मंदिर आहे. मंदिराचे व्यवस्थापन शिस्तबद्ध असल्यामुळे मंदिर व मंदिर परिसर स्वच्छ असतो. मंदिरात मारोतीची १५ फुटी उभी मूर्ती आहे. अत्यंत सुंदर आणि विलोभनीय मूर्तीच्या पायाशी राक्षस असून हातावर द्रोणागीरी पर्वत आहे. या ठिकाणी हनुमान जयंती ला विशेष यात्रा असते. तसेच सोमवती अमावास्येला येथील संगमावर स्नान करून मारुतीचे दर्शन करायला भाविक येतात.
येथेच जवळ भैरवगड नावची अत्यंत जिर्णावस्थेतील गढीवजा इमारत आहे. या जागी पूर्वी गोंड राजांचा किल्ला असल्याचं बोललं जातं. आणि तो किल्ला नरनाळ्याचा उपविभाग म्हणून कार्यरत असल्याचं सांगतात. या किल्ल्याच्या बाबतीत अनेक जन आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
एका दिवसाच्या सहलीसाठी उत्तम असे हे ठिकाण असून , तेल्हाऱ्याला नोंद करून परवानगी घेतल्यास तुम्ही वान प्रकल्प सुद्धा पाहू शकता. वान धरणाच्या भिंतीवर उभे राहून ,दोन डोंगराच्या मधे पसरलेला तो विस्तीर्ण जलाशय पाहताना मन थक्क होतं. येथे लवकरच छोटा जलविद्युत प्रकल्प होण्याचं प्रस्तावित आहे.
अंतर :
तेल्हाऱ्यापासून ३० किमी,
अकोट पासून ३५ किमी,
अकोल्यापासून ७५ किमी.
योग्य वाहन : बस किंवा खाजगी वाहन.