jump to navigation

रामटेक February 28, 2006

Posted by neelkant in माहिती, विदर्भ.
add a comment

राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवल्या गेले. नागपूर पासून ५५ किमी वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. श्रीरामाचे सेना गण म्हणजे वानरांचा मुक्त संचार येथे आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे.

संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे ‘शाकुंतल’. कविकुलगुरू कालिदासाने हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले आहे. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे.

या शहरा बद्दलचे आणखी एक आकर्षण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांचे हे जन्मगाव . त्यांच्या राहत्या घराला संघाने एका स्मारकाचे स्वरूप दिले आहे. संपूर्ण भारतातून संघ स्वयंसेवक या घराला भेटी देतात.

रामटेक परिसरात नुकताच पुरातन बौद्ध  संस्कृतीचा शोध लागला आहे. त्या परिसरात उत्खनन चालू आहे.

नागपुरावरून येथे येण्यासाठी सतत बस आहेत. व्यावसायिक वाहने सुद्धा उपलब्ध आहेत.

किल्ले नरनाळा February 26, 2006

Posted by neelkant in माहिती, विदर्भ.
add a comment

अकोला जिल्ह्यातील हा अतिशय दुर्गम गिरिदुर्ग. अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर तो पसरलेला आहे.अकोल्या पासुन याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानुर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्या पासून गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.

गड जमीनीपासून ३१६१ फुट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकर असून गडाच्या कोटाची (तटबंदी) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुदा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरीदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखल्या जात असून तेलीयागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.

गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानुर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गुळफुटाने वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.

गडावर आजही राणी महाल व बाजूची मस्जीत अस्तित्वात आहे. त्या समोरचा सभामंडप आता नसला तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतात. सरळ पुढे गेल्यास तेला- तूपाचे टाके लागतात. खोल टाक्या असून त्यात विभागणी केलेली आहे; आणि त्यांना युध्दकाळात तेल-तूप साठवण्यासाठी वापरल्या जात असे.

गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर ‘नऊगजी तोफ’ दिसते. ही तोफ अष्टधातुची असून इमादशहाच्या काळात गडावर आणल्या गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. तोफेचे तोंड गडपायथ्याच्या शहानुर गावाकडे रोखलेले आपणास लक्षात येते. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोऱ्यात चंदन व साग झाडांची फार दाट पसरण आहे. 

 गड नेमका कुणी आणि कोणत्या काळात बांधला या बाबत नक्की माहिती नाही पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्या वरून हा गड ‘गोंड राजांनी’ बांधला असल्याचे बोलले जाते. गडावर नागपूरकर भोसले कालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहीत हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातुन येणाऱ्या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.  

संत गाडगे महाराज February 18, 2006

Posted by neelkant in माहिती, विदर्भ.
5 comments

                         Santgadge Baba.

जन्मगाव- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगाव .

जन्मदिनांक – २३ फेब्रुवारी १८७६

मुळनाव – डेबुजी झिंगराजी जानोरकर

गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.

ऋणमोचन   येथे त्यांनी ‘लक्ष्मीनारायणाचे’मंदिर बांधले.

१९०८ मध्ये पुर्णा नदीवर घाटाचे निर्माण केले.

१९२५- मुर्तीजापूर येथे गोरक्षण , धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण केले.

१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळेचे निर्माण गाडगेमहाराजांनी केले.

“मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही” असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.

८ फेब्रुवारी १९५२ रोजी ‘श्री गाडगेबाबा मिशन’ स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.

गाडगे महाराज जातीने परिट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.

१९३२ – ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.

गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.

“गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.

आचार्य अत्रे गाडगेबाबां बद्दल म्हणतात ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात’

१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.

१९५४- जे‍.जे. हॉस्पिटल धर्मशाळा ( मुंबई) बांधली.

गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.

डॉ आंबेडकर सुद्धा त्यांना गुरू स्थानी मानत असत.

२० डिसेंबर १९५६ रोजी वलगाव (अमरावती) येथे मृत्यू.

गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

अमरावती शहर February 4, 2006

Posted by neelkant in माहिती.
8 comments

अमरावती शहर हे अमरावती जिल्हा तसेच अमरावती विभागाचे प्रमुख शहर आहे. शहर उंचीवर वसलेले असल्यामूळे हवामान थंड आहे. मुबलक प्रमाणात झाडे व शहराच्या परिसरात असणाऱ्या तलावांमुळे पाण्याची मुबलकता आहे. मेळघाट व चिखलदरा परिसर येथुन जवळच आहे. शहराजवळ १० किमी वर पोहरादेवी हे अभयारण्य आहे. शहराला लागुनच डोंगर असल्यामुळे डोंगर कुशीत बसल्यासारखे हे सुंदर शहर मनाला आकर्षीत करते. अमरावती विद्यापीठ हे शहराच्या पुर्वेस आहे. अतिशय नयनरम्य वातावरणात पर्वत पायथ्याशी हे विद्यापीठ आहे. खुप मोठा व विवीध प्रकारच्या झाडांनी याचा परिसर समृध्द आहे. या विद्यापीठाला आता संत गाडगे बाबा विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. येथे संत गाडगेबाबा अद्यासन चालवले जाते. शैक्षणीक दृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थी प्रिय ठिकाण आहे. येथे विदर्भ ज्ञान विज्ञान संथेचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, शासकिय अभियांत्रीकी महाविद्यालय, शासकिय तंत्रनिकेतन, पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, विद्याभारती कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, केशरबाई लाहोटी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, श्री शिवाजी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, बियाणी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, तक्षशीला कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, सिपना अभियांत्रीकी महाविद्यालय , बडनेरा अभियांत्रीकी महाविद्यालय , अशी मोठी यादीच देता येईल. शिक्षणाच्या सोईमुळे अमरावती हे पश्चीम विदर्भाचे मुख्य केन्द्र झाले यात काही नवल नाही. अमरावती गावाची रचना फार छान आहे. विस्तृत रस्ते आणि शहराचा विस्तीर्ण प्रसार गावाला भरीवता देतात. मुख्य चौक म्हणजे राजकमल चौक, इर्विन चौक, श्याम चौक, राजापेठ चौक, पंचवटी चौक, अंबापेठ चौक, आणि बस स्थानकाला येथे डेपो असं म्हणतात तो डेपो चौक. हे ऐतिहासीक शहर असल्यामूळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबागेट , जवाहर गेट अश्या नावाने प्रसिध्द आहेत. फार पुर्वीचे गाव हे तटबंदीच्या आत वसलेले असायचे. आज गावाचा प्रसार फार झाला आहे आता मनपाच्या हद्दी बाजुच्या उपनगारांच्या बाहेर गेल्या आहेत. वलगाव, बडनेरा आता अमरावती शहरात मोडतात. शहराचे मुख्य भाग म्हणजे अंबा पेठ, गाडगे नगर, साईनगर, श्री कृष्ण पेठ, दस्तुर नगर, राजापेठ, सातुर्णा, कंवर नगर, रुक्मीणी नगर, यशोदा नगर, इत्यादी. गावाचं मुख्य दैवत म्हणजे अंबादेवी. गावाच्या मध्यावर अंबापेठेत देवीचे पुरातन देऊळ आहे. असं म्हटल्या जातं की रुक्मीणी ने श्रीकृष्णाला याच मंदिरात बोलावले होते. येथे श्रीकृष्णाने देवीची पुजा करुन रुक्मीणीला सोबत नेले होते. मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या खाली योगाचार्य जनार्दन स्वामी यांची समाधी आहे. शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ . हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शाररीक शिक्षण महाविद्यालय असून संपुर्ण भारतातून मुलं येथे शिक्षणासाठी येतात. श्री शिवाजी राव पटवर्धन यांनी स्थापन केलेला तपोवन हा कुष्ठरोग्यांसाठीचा प्रकल्प शहराच्या पुर्वेला विद्यापीठासमोर आहे.

माझं गाव – तेल्हारा February 1, 2006

Posted by neelkant in माहिती.
2 comments

हे गाव अकोला ह्या जिल्हा ठिकाणाहून उत्तर पश्चिमेला तालुका म्हणून आहे. गाव तसं छोटंसंच पण खूप छान. तापी पुर्णा खोऱ्यातील काळी कसदार जमीन. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. पाण्याची बारा महिने उपलब्धतता नसल्यामुळे शेती प्रामुख्याने कोरडवाहू . .

गावात श्री शिवाजी महाविद्यालय व शेठ बंसीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटी द्वारे प्राथमिक ,माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा चालवल्या जातात. तसेच विज्ञान शाखेचा कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालय स्तरावरचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कला व वाणिज्य शाखेच्या पदवी पर्यंतचा अभ्यासक्रमासाठी श्री गोपाळराव खेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय आहे. आताशा शिक्षण पदविका व शिक्षण पदवी हे अभ्यासक्रम सुद्धा सुरू झाले आहेत.

गावच्या बाहेर दत्तवाडी म्हणुन दत्ताचे सुदंर देऊळ आहे. येथे दर दत्त जयंतीला यात्रा भरते.

गावातुन एक पावसाळी प्रवाह असलेली गौतमा नावाची छोटी नदी वाहते. ही पुर्णा नदीची उपनदी आहे. नदीच्या प्रवाहाच्या मधात आणि गावाच्या दक्षीणेकडे श्री गौतमेश्वराचे सुंदर देऊळ आहे. फार पुरातन शिवलिंग येथे स्थापित आहे. गावात लटीयाल भवानी मंदिर(भवानी पेठ) विठ्ठल मंदिर(मुख्य पेठ), दुर्गादेवी (प्रताप चौक) , मारोती मंदिर (कसबा) गजानन महाराज मंदिर ( वान प्रकल्प) महानुभाव पंथी कृष्ण मंदिर ( गाडेगाव रस्ता) प्रसिध्द आहेत.